गुगल आणि फेसबुकची मक्तेदारी असलेल्या १२९ अब्ज डॉलर उलाढालीच्या डिजिटल जाहिरात क्षेत्रात अॅमेझॉनने आता नव्या मार्गाने प्रवेश केला आहे. स्मार्टफोन्समधील आपल्या शॉपिंग अॅपच्या माध्यमातून अॅमेझॉन व्हिडिओ जाहिरातींसाठी विविध ब्रॅण्डसना जागा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे मोबाइल जाहिरातक्षेत्रात अमेझ़ॉनने आता गुगल आणि फेसबुकसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

या जाहिरातीच्या नव्या प्रकारामध्ये जेव्हा युजर शॉपिंग अॅपमध्ये एखादी गोष्ट सर्च करेल तेव्हा त्याला त्यासंबंधीचा एक छोटासा व्हिडिओ दिसेल. फेसबूक आणि युट्युबवरील व्हिडीओ पाहताना मध्येच दिसणाऱ्या जाहिरातींपेक्षा अॅपवर एखादे प्रॉडस्ट शोधताना आलेल्या अशा जाहिरातींना जास्त प्रतिसाद मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये आव्हान निर्माण करणारी कंपनी म्हणून अमेझॉनचा उदय झाला आहे. अमेरिकेत ऑनलाइन प्रॉडक्ट विक्रीमध्ये या कंपनीने ५० टक्के हिस्सा काबीज केला आहे. ई मार्केटरच्या माहितीनुसार, यावर्षी अमॅझॉनचा डिजिटल जाहिरातीचा बाजारातील हिस्सा हा ६.८ टक्क्यांवरुन ८.८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सध्या या क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या गुगला हिस्सा ३८.२ टक्क्यांवरुन ३७.२ टक्क्यांवर घसरू शकतो.

अधिकाधिक व्हिडिओ जाहिरातींच्या जागा विक्रीमुळे अमॅझॉनच्या जाहिरात विभागासाठी हा नवा उत्पन्नाचा स्त्रोत असणार आहे. या जाहिरातींसाठीच्या जागेत कंपनीकडून ब्रॅण्डचे लोगो, प्रॉडक्टचे फोटोज आणि माहिती देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मोबाईल अॅपमध्ये केल्या जाणाऱ्या व्हिडिओ जाहिराती आणि स्पॉट्स हा टीव्हीवरील व्यावसायिक जाहिरातींसारखाच प्रकार आहे. बाजारातील विविध ब्रॅण्ड यंदाच्या वर्षात मोबाईलवर व्हिडिओ जाहिरातींसाठी सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक २२.६ टक्क्यांनी अधिक आहे. लोकांचे मोबाईलवर व्हिडिओज पाहण्याचे प्रमाण अधिक असल्याने जाहिरातीचा हा नवा प्रकार ब्रॅण्डससाठी फायद्याचा ठरणार आहे, असेही ई मार्केटरने म्हटले आहे.

मोबाईलवरील अॅप जाहिरातीच्या क्षेत्रात प्रवेशापूर्वी अमॅझॉनने अनेक महिने अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर या जाहिरातींची चाचणी घेतली आहे. ग्राहकांसाठी ते कसे सोयीचे राहिल याची यात तपासणी करण्यात आली. या वर्षानंतर गुगलच्या अॅन्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवरही याची चाचणी घेण्यात येणार आहे.