सध्या देशात करोनाबाधितांची संख्य़ा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयं असतील किंवा रुग्णवाहिका असतील त्यांनी मनमानी पद्धतीनं रुग्णांकडून पैसे आकारल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील कोलकात्यात घडली. एका रुग्णवाहिका चालकाचा मनमानी कारभार यातून समोर आला आहे. करोनाबाधित मुलांना ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकानं तब्बल ९ हजार ६०० रूपयांची मागणी केली.

पीटीआय या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिकेच्या चालकानं मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्यानंतर करोनाबाधित मुलांना आणि त्यांच्या आईला रस्त्यातच उतरवण्यात आलं. परंतु त्या मुलांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी हस्तक्षेप केल्यानंतर चालक २ हजार रुपये घेण्यास तयार झाला. त्यापैकी एका करोनाबाधित मुलाचं वय साडेनऊ वर्षे आणि दुसऱ्या मुलाचं वय नऊ महिने आहे. दोघांवरही कोलकात्यातील सर्कस पार्क परिसरातील इंन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थमध्ये उपचार सुरू आहेत.

दोन्ही मुलांची डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर ते दोघेही करोनाबाधित असल्याचं समोर आलं. दोघांनाही आयसीएचमधून करोनावरील उपचारासाठी असलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येणार होतं. त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. परंतु रुग्णवाहिका येण्यास उशिर झाल्यामुळे त्यांना ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या केएमसी या रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला.

यादरम्यान रुग्णवाहिकेच्या चालकानं त्यांच्याकडे ९ हजार २०० रुपयांची मागणी केली. परंतु त्यांनी तेवढे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर चालकानं लहान बाळाला देण्यात आलेला ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकला आणि आईसह दोन्ही मुलांना धक्के देऊन रुग्णवाहिकेतून उतरवल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली. त्यांना विनंती करूनही त्यांनी ऐकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.