अमेरिकेत आज लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी मोठी घटना घडली. भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर विजय मिळवल्याची घोषणा करण्यात येणार होती. एएफपीने हे वृत्त दिले आहे.
या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने हे सर्व घडवण्यात आले. सत्ता संघर्षातून आज अमेरिकेत जे काही घडलं, ते धक्कादायक होतं. खुद्द ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनाही हे मान्य नाही. मुदत पूर्ण होण्याआधीच ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदावरुन गच्छंती करण्यासंदर्भात मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये चर्चा झाली. अमेरिकेतील तीन वृत्तवाहिन्यांनी ही बातमी दिली आहे.
अमेरिकन संविधानातील २५ व्या दुरुस्तीबद्दल चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष योग्य पद्धतीने आपले कर्तव्य बजावत नसेल, तर संविधानातील २५ वी दुरुस्ती उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाला राष्ट्राध्यक्षाला पदावरुन हटवण्याचा अधिकार देते. ट्रम्प नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यामुळे २५ व्या दुरुस्तीच्या वापराबद्दल चर्चा झाली असे एका रिपब्लिकन नेत्याच्या हवाल्याने सीएनएनने म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण ट्रम्प हा पराभव मान्य करायला तयार नाही. निवडणुकी प्रक्रियेत काहीतरी गडबड झाल्याचा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांनी अजूनही आपला पराभव मान्य केलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची आंदोलकांना फूस असल्यामुळे हे सर्व घडून आले, असा आरोप करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 1:31 pm