अलास्काच्या पश्चिमेला आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीमध्ये आलेल्या सहा रशियन लष्करी विमानांना अमेरिकेच्या फायटर विमानांनी रोखले. या भागातून रशियन विमाने बाहेर जाईपर्यंत अमेरिकन फायटर विमानांनी त्यांचा पाठलाग केला. उत्तर अमेरिकेच्या हवाई सुरक्षा कमांडने मंगळवारी ही माहिती दिली. या सहा विमानांमध्ये चार टीयू-९५ स्ट्रॅटजिक बॉम्बर आणि दोन एसयू-३५ फायटर विमाने होती.

अमेरिकेच्या अत्याधुनिक एफ-२२ फायटर विमानांनी रशियन बॉम्बर विमानांचा मार्ग रोखला. अमेरिकेच्या अवॉक्स टेहळणी विमानांचे या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष होते असे एनओआरएडीकडून सांगण्यात आले. रशियन विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही ती विमाने संपूर्ण वेळ आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रामध्ये होती.

अलास्का हवाई सुरक्षा झोनमध्ये प्रवेश करताच या विमानांच्या हालचाली टिपण्यास सुरुवात झाली. अमेरिकन हवाई सुरक्षा यंत्रणेचे आपल्या हवाई हद्दीजवळ घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष असते. शत्रूकडून धोका आहे हे लक्षात येताच कमीत कमी वेळात उत्तर देण्यासाठी यंत्रणा सज्ज असते.

आमच्या देशातील नागरीकांच्या जीवाला तसेच महत्वाच्या स्थळांना धोका असल्यास तो रोखण्यास आणि त्याचा पाडाव करण्यास आम्ही सक्षम आहोत असे एनओआरएडीचे कमांडर जनरल टेरेन्स यांनी सांगितले. आम्ही वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास सर्तक असतो असे त्यांनी सांगितले. अमेरिकेमध्ये चार एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन्स आहेत. अलास्काचा झोन किनारपट्टीपासून ३२० किलोमीटर पर्यंत पसरला आहे.