अणू कार्यक्रमाच्या मुद्दय़ावरून अमेरिकेने इराणवर र्निबध लादले आहेत. मात्र इराणकडून तेल घेण्याबाबत घातलेल्या बंदीतून भारतासह आठ देशांना सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी अमेरिकेने घेतला. इराणकडून सहा महिने तेल आयात करण्यास अमेरिकेने बंदी घातली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी म्हणाले की, भारत, चीन आणि इतर सात देश अमेरिकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार सवलतीस पात्र ठरले आहेत. या देशांचे इराणकडून आयात होणाऱ्या क्रूड तेलाचे प्रमाण कमी झाले आहे. भारत, चीनसह अन्य देशांमध्ये मलेशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, तुर्कस्थान आणि तैवान यांचा समावेश आहे.
भारताने इराणकडून २०१२-१३ या आर्थिक वर्षांत १३.३ दशलक्ष टन क्रूड तेल आयात केले होते. गेल्यावर्षी हे प्रमाण १८.१ दशलक्ष टन इतके होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत इराणकडील तेलाच्या आयातीत घट झाल्यामुळे अमेरिकेने भारताला सवलत दिली आहे.
इराणने आपला अणू कार्यक्रम बंद करावा यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था खांद्याला खांदा लावून प्रयत्न करीत असल्याचे केरी यांनी सांगितले. इराण अणू कार्यक्रम अण्वस्त्रांसाठी राबवत असल्याचा संशय करण्यात येत आहे. त्यामुळे इराणवर दबाव टाकून तसेच र्निबध लादून त्यांना अणू कार्यक्रमापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.