21 February 2019

News Flash

अपघातानंतर अमेरिकेची शक्तीशाली F-35 विमाने आली जमिनीवर

अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली एफ-३५ स्टेल्थ फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिकेने एफ-३५ ची सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत.

अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली एफ-३५ स्टेल्थ फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिकेने एफ-३५ ची सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. एफ-३५ हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडे फायटर विमान आहे. २८ सप्टेंबरला दक्षिण कॅरोलिनामध्ये एफ-३५ विमान कोसळले. सुदैवाने या अपघातातून वैमानिक बचावला. नियमित सरावासाठी य़ा विमानाने उड्डाण केले होते.

या दुर्घटनेनंतर अमेरिकेसह, ब्रिटन आणि इस्त्रायलने एफ-३५ ची उड्डाणे तूर्तास स्थगित केली आहेत. या फायटर विमानांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच पुन्हा उड्डाणासाठी हिरवा कंदिल दाखवला जाईल. या विमानाच्या फ्युल टयुबमध्ये बिघाड असण्याची शक्यता आहे. काही विमानांमधील फ्युल टयुब बदलण्यात येतील.

दक्षिण कॅरोलिनाच्या ब्युफोर्ट भागात एफ-३५ बी कोसळले. पुढच्या २४ ते ४८ तासात सर्व तपासण्या पूर्ण करण्यात येतील. एफ-३५ विमानांचा प्रकल्प १९९० साली सुरु करण्यात आला. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात महागडा शस्त्रास्त्र प्रकल्प आहे. पुढच्या काही वर्षात अडीज हजारापर्यंत एफ-३५ विमानांची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. एफ-३५ चे वैशिष्टय म्हणजे या विमानात रडारला चकवा देण्याची क्षमता आहे. खरंतर या प्रकल्पाने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतला आहे.

First Published on October 11, 2018 10:00 pm

Web Title: america f 35 fleet grounded