अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पोम्पिओ हे 25 ते 27 जून दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेशी असलेल्या व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर पोम्पियो आणि मोदी यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

भारत आणि अमेरिकेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहेत. तसेच या बैठकीत G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा अजेंडा निश्चित केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. भारत दहशतवाद, इराण आणि अॅन्टी मिसाइल सिस्टम S-400 वरील आपली भूमीका स्पष्ट करणार आहे. भारत रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार आहे. परंतु अमेरिकेकडून या व्यवहाराला विरोध होत आहे.

मोदी आणि पोम्पियो यांची बैठक G20 परिषदेपूर्वी होत असल्याचे ती महत्त्वाची मानली जात आहे. जपानमधील ओसाका येथे या बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.