चीनच्या हुआवे कंपनीला गुगलने दणका दिला आहे. या कंपनीचे स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही अपडेट न देण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सायबर हल्ल्याच्या धर्तीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. सायबर हल्लेखोर अमेरिकन कम्युनिकेशन सिस्टम्सना हॅक करण्याची शक्यता असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले होते. तसेच त्यांनी कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नसले तरी त्यामध्ये हुआवे या कंपनीचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता गुगलनेही या कंपनीचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना कोणतीही तांत्रिक मदत न देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतेच अमेरिकेने हुआवे या कंपनीला विना परवाना अमेरिकन ट्रेड कंपन्यांशी व्यापार करता येणार नाही अशा कंपन्यांच्या यादीत टाकले आहे. या धर्तीवर गुगलने हा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारच्या निर्णयाचे पालन करत असल्याची प्रतिक्रिया गुगलकडून देण्यात आली. दरम्यान, गुगलच्या या निर्णयानंतर हुआवेचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना कोणतीही तांत्रिक मदत आणि सिक्युरिटी अपटेड मिळणार नाही. तसेच YouTube आणि Google Maps हे अॅप या मोबाईलवर उपलब्ध होणार नाहीत. तसेच अॅड्रॉईडचे नवे व्हर्जनही मिळणार नाही. परंतु हुआवे ओपन सोर्स लायसन्सने मिळणारे अॅन्ड्रॉईड व्हर्जन वापरू शकेल.

गुगल शिवाय Intel, Qualcomm आणि Broadcom या चीप डिझायनर कंपन्यांनीही हुआवेशी व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भात वृत्त दिले आहे. इंटेल हुआवे कंपनीला सर्व्हर चीप आणि लॅपटॉपसाठी प्रोसेसर पुरवत होती. दरम्यान, अमेरिकन कंपन्यांच्या बंदीची शक्यता पाहता हुआवेने स्वत:चे ओएस डेव्हलप करण्यास सुरूवात केली होती. तसेच सध्या या ओएसची चाचणीही सुरू आहे. चीनमध्ये यापूर्वीच गुगलच्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे चीनमधील ग्राहकांवर या निर्णयाचा फारसा फरक पडणार नाही.