एच-१बी व्हिसा मिळवण्यासाठीचे नियम कठोर केल्यानंतर आता एच-१बी व्हिसा धारकाच्या जोडीदाराला अमेरिकेत नोकरी करण्यापासून रोखण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार आहे. एच-१बी व्हिसा धारकाच्या जोडीदारावर अमेरिकेत नोकरी करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव अंमलात आला तर एक लाख लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. व्हिसा धारक आणि त्यांच्या कंपनीच्या मालकावर याचा नकारात्मक परिणाम होईल असे एका नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा धारकाच्या जोडीदारावर काम करण्यावर बंदी घातली तर जोडीदार समाजिकदृष्टया एकाकी पडेल, घरगुती तणाव वाढेल तसेच आर्थिक स्त्रोत कमी झाल्यामुळे चिंता वाढतील असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याआधी ओबामा प्रशासनाच्या राजवटीत २०१५ मध्ये एच-१ बी व्हिसा धारकांच्या जोडीदाराला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देण्यात आली.

वर्क व्हिसा कार्यक्रम हा अमेरिकेत १९५२ साली सुरु झाला. या कार्यक्रमातंर्गत अमेरिकेत एखाद्या कामासाठी पात्र, योग्य उमेदवार नसेल तर परदेशातून तात्पुरत्या कालावधीसाठी उमेदवाराला बोलवून घेण्याची परवानगी अमेरिकन कंपन्यांना मिळाली. या वर्क व्हिसा सुविधेचा अमेरिकन कंपन्यांनी मोठया प्रमाणावर दुरुपयोग केल्याचा आरोप होत आहे. कमी वेतनात कर्मचारी मिळतात म्हणून भारतासह अन्य देशातून अमेरिकन कंपन्यांनी मोठया प्रमाणावर कर्मचारी भरती केल्याचा आरोप आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकन कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत व्हिसासाठीचे नियम कठोर केले. त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसत आहे. कारण भारतातून दरवर्षी मोठया प्रमाणावर युवा वर्ग अमेरिकेत नोकरीसाठी जात असतो.