भारताच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या आश्वासनाचा पाकचा दावा

भारताने कितीही विरोध दर्शविला तरी पाकिस्तानला एफ-१६ जातीची आठ लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवारी येथे सांगितले.

भारत आणि अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी सदर विमाने पाकिस्तानला मिळू नयेत यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही बराक ओबामा प्रसाशन पाकिस्तानला विमाने उपलब्ध करून देण्यास बांधील आहे, असे आसिफ यांनी म्हटले आहे.

रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या अमेरिका काँग्रेसने इस्लामाबादला एफ-१६ विमानांची विक्री करण्यावर र्निबध घातले आहेत, असे वृत्त आल्यानंतर आसिफ यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे. दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यास पाकिस्तान अनुत्सुक असल्याने पाकिस्तानविरोधी भावना तीव्र झाल्या आहेत.

अमेरिकेत काँग्रेसने विमानांच्या विक्रीला प्रतिबंध केल्याबाबत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर मंत्र्यांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. भारत आणि हक्कानी यांनी अमेरिकेत काँग्रेसवर कशा प्रकारे दबाव आणला ते आसिफ यांनी स्पष्ट केले नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाने गेल्या ऑक्टोबर महिन्यांत अमेरिका पाकिस्तानला एफ-१६ जातीची विमाने विकण्याची तयारी करीत असल्याचे म्हटले होते.