आपण अनेकदा मॅक्डोनाल्ड्ससारख्या ठिकाणी खाण्यासाठी जात असतो. बर्गरसोबत फ्राईस, कोल्डड्रिंक असा काहीसा बेतही आखत असतो. अनेकांना बर्गरसोबत आपल्याला टोमॅटो केचअपही देण्यात येतं. अनेकदा आपण अधिकची केचअपचे पाऊचही मागतो. परंतु केवळ केचअप देण्यावरून जर कोणी मॅक्डोनाल्डच्या कर्मचाऱ्यावर बंदूक दाखवली तर. होय हे अगदी खरंय. अमेरिकेतील टॅनिसीमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी एकाला या प्रकरणी अटक केली आहे. परंतु अटकेचं कारण ऐकलंत तर तुम्ही हैराण व्हाल. एका ग्राहकानं मॅक्डोनाल्डच्या कर्मचाऱ्याला बंदूक दाखवली कारण त्यानं ग्राहकाला बर्गरसोबत केचअप दिलं होतं.

असाई वेस्टर नावाच्या तरूणीनं गाडी चालवत असताना मॅक्डोनाल्डमध्ये ऑर्डर दिली होती. परंतु ऑर्डरसोबत जेली ऐवजी केचअप दिल्यानं तिला राग अनावर झाला. तिने बराच वेळ मॅक्डोनाल्डच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला. तो वाद इतका विकोपाला गेला की त्या महिलेनं चक्क आपल्याकडे असलेली बंदूकच कर्मचाऱ्यासमोर काढली. परंतु त्या ठिकाणी कोणालाही इजा झाली नाही. तसंच त्या तरूणीनं त्या ठिकाणाहून पळ ठोकला. फॉक्स न्यूजनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी त्या तरूणीला अटक केली आहे. तसंच अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. तसंच अन्य व्यक्तींना गंभीर इजा पोहोचवण्याच्या कलमाखालीही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात आली.