नियोजनबद्ध, वेगवान लसीकरणाचा सुपरिणाम

अमेरिका आता करोना साथीतून पुन्हा पूर्वपदावर येत असून लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनी आता मुखपट्टी वापरण्याची गरज नाही, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे.

घरात व बाहेर वावरणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणाच्या सर्व मात्रा पूर्ण केल्या असल्यास मुखपट्टी लावण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी व्हाइट हाऊस येथील रोज गार्डन येथे मुखपट्टी न लावता ही घोषण केली.

बायडेन यांनी सांगितले की, मुखपट्टीच्या वापरातून मुक्तता हा एक मैलाचा दगड असून आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. अमेरिकेत लसीकरण वेगाने सुरू आहे. सीडीसी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे त्यांनी सांगितले की, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींकडून दुसऱ्याला कोविड १९ होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे तुम्ही लसीकरण पूर्ण केले असेल तर मुखपट्टी वापरण्याची गरज नाही. दोन मात्रांची लस असेल तर दोन मात्रा पूर्ण केल्यानंतरच मुखपट्टीचा वापर बंद करता येईल. जर लसीकरण झाले नसेल तर मुखपट्टी वापरावीच लागेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी मुखपट्टी वापरणे बंद केले तरी चालणार आहे.

अमेरिकेत ११४ दिवसात २५ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. पन्नास पैकी ४९ राज्यात लसीकरण झाल्यानंतर रुग्ण संख्या कमी झाली असून एप्रिल २०२०नंतरच्या काळात  लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मृतांची संख्या ८० टक्के कमी झाली, असे बायडेन यांचे म्हणणे आहे. चार महिन्यांत साठ टक्के  प्रौढांना लशीची निदान एक मात्रा तरी देण्यात आलीे, रोजगार वाढून    अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

पेंटॅगॉनतर्फे भारताला १५९ प्राणवायू कॉन्संट्रेटर 

अमेरिकी संरक्षण दले भारताला १५९ ऑक्सिजन काँन्संट्रेटर्स व्यावसायिक विमानातून पुढील आठवड्यात पाठवणार आहेत. संरक्षण रसद पुरवठा संस्था १५९ प्राणवायू कॉन्संट्रेटर्स ट्रॅव्हिस हवाई तळावरून पाठवणार आहे. सोमवारी म्हणजे १७ मे रोजी भारताला व्यावसायिक विमानाने प्राणवायू कॉन्संट्रेटर्स पाठवण्यात येणार आहेत.

असे पेंटगॉनचे प्रसिद्धी सचिव डॉन किरबी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत सरकारच्या आम्ही संपर्कात असून करोना विरोधातील लढाईत अमेरिका भारताच्या पाठीशी आहे. आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी सांगितले की, पेंटॅगॉन सर्वतोपरी भारताला मदत करील. दोन्ही देशांचे नेते एकमेकांशी समन्वयाने काम करीत आहेत.