वॉशिंग्टन : मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्लय़ातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला भारताच्या ताब्यात देता येणार नाही, पण पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योजक तहव्वुर राणा याला याच  हल्लय़ाचा कट आखण्याच्या आरोपाखाली भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते, असे अमेरिकी सरकारच्या वकिलांनी संघराज्य न्यायालयात सांगितले. राणा याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना ही माहिती त्यांनी दिली.

राणा हा  हेडलीचा बालपणीचा मित्र असून त्याला १० जूनला लॉस एंजलिस येथे फेरअटक करण्यात आली होती. २००८ च्या मुंबई हल्ला प्रकरणी राणा याला ताब्यात देण्याची मागणी भारताने केली होती. मुंबईतील  हल्लय़ात सहा अमेरिकी नागरिकांसह १६६ लोक मारले गेले होते. संघराज्य अभियोक्त्यांनी सांगितले, की २००६ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान राणा याने दाऊद गिलानी म्हणजे हेडली तसेच पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व हरकत उल जिहाद ए इस्लामी या दहशतवादी संघटनांच्या मदतीने मुंबई हल्लय़ाचा कट आखला होता. पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी हेडली हा २००८ च्या मुंबई हल्लय़ाचे कटकारस्थान रचण्यात सामील होता. त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. तो सध्या अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. राणाला ताब्यात देण्याची विनंती भारताने केली असून ती लवकरच विचारात घेतली जाईल. भारताने दिलेल्या विनंती अर्जात, त्याने भारतात केलेले गुन्हे व इलिनॉइस येथील खटले  वेगवेगळे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकी वकील जॉन लुलेजियान यांनी सांगितले, की हेडलीने लगेच सर्व आरोप मान्य केले होते. हेडली याने सर्व अटींची पूर्तता केली असल्याने त्याला भारताच्या ताब्यात दिले जाणार नाही. राणा याची परिस्थिती वेगळी असून त्याने आरोप मान्य केलेले नसून अमेरिकेला खटल्यात सहकार्य केलेले नाही. त्यामुळे त्याला हेडलीसारखी सूट आम्ही देऊ शकत नाही.