भारत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याच्या निर्णयावरुन माघार घेणार नाही. रशिया बरोबर केलेल्या एस-४०० करारामुळे अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याचा धोका असला तरी भारत पाच अब्ज डॉलरचा करार रद्द करणार नाही. भारताने याबद्दल ठाम भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ आज रात्री भारत दौऱ्यावर येत आहेत.

रशिया दीर्घकाळापासून भारताचा महत्वाचा संरक्षण भागीदार राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकापासूनचे संरक्षण संबंध आहेत. त्यामुळे रशिया बरोबरचा करार रद्द करणार नाही हे पॉम्पिओ यांना भारताकडून स्पष्ट केले जाईल. एनडीटीव्हीने राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

एस-४०० खरेदीवर अमेरिकन कायद्यातून सवलत देता येणे शक्य आह हे भारताकडून अमेरिकेला सांगण्यात येईल. एस-४०० ही रशियाने अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. ४०० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा शेजार लाभलेला आहे. त्यांचे भारताबद्दलचे धोरण लक्षात घेत ही क्षेपणास्त्र प्रणाली आवश्यक आहे.

अमेरिका आपल्या कायद्याचा हवाला देऊन इराण, उत्तर कोरिया आणि रशिया यांच्याबरोबर व्यवहार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादते. टर्कीनेही रशियाकडून एस-४०० विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेने टर्कीला एफ-३५ फायटर विमानांचा करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. माइक पॉम्पिओ भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतील.