गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट रोजी काबूल पडलं आणि तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पूर्णपणे आपला अंमल प्रस्थापित केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर तालिबान्यांनी आपलं काळजीवाहू सरकार स्थापन झाल्याचं घोषित केलं. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे असा मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा आता तालिबानच्या या नव्या सरकारचा पंतप्रधान आहे. त्यामुळे समस्त जगच दहशतवाद्यांनी स्थापन केलेल्या या सरकारकडे काळजीने, शंकेने आणि भितीने पाहात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने तालिबान्यांच्या या सरकारबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमधून परतल्यानंतर लागलीच तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे अमेरिकेची यासंदर्भातली भूमिका महत्त्वाची ठरते.

“…याची आम्हाला काळजी वाटते!”

अमेरिकेच्या गृहविभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमधील नव्या सरकारविषयीच्या भूमिकेचे संकेत देण्यात आले आहेत. “अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमधील व्यक्तींची नावं आम्हाला समजली आहेत. हे सर्व सदस्य तालिबानचे असून त्यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. यातल्या काही सदस्यांचा इतिहास आणि त्यांचे इतर काही दहशतवादी गटांशी असलेले संबंध याची आम्हाला काळजी वाटते”, असं या निवेदनात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडे अफगाणिस्तानचे गृहमंत्री पद; भारतीय दूतावासावर केला होता हल्ला

तालिबान्यांची कृती महत्त्वाची, शब्द नव्हे!

दरम्यान, तालिबानी सरकारच्या ध्येयधोरणांविषयी अमेरिकेची भूमिका काय असेल, याविषयी देखील यात उल्लेख करणयात आला आहे. “आम्हाला याची कल्पना आहे की तालिबान्यांनी सध्या फक्त त्यांचं काळजीवाहू मंत्रिमंडळ जाहीर केलं आहे. मात्र, तरीदेखील आम्ही तालिबान्यांची कृती खरी मानू, पण त्यांचे शब्द खरे मानणार नाहीत”, अशी भूमिका यात नमूद करण्यात आली आहे. यासोबतच, तालिबान्यांनी अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांची अडवणूक करू नये, असं देखील यामध्ये सांगण्यात आलं आहे.

ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी दिला धोक्याचा इशारा; म्हणाले, “इस्लामवाद हा जागतिक सुरक्षेला…”

मुल्ला मोहम्मद अखुंद याच्याकडे तालिबानचं पंतप्रधानपद देण्यात आलं आहे. अखुंद हा संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला दहशतवादी आहे. तर मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद सोपवण्यात आलं आहे. बरादर हा तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकी फौजा परतल्यानंतर तालिबान्यांशी चर्चा करण्यात मध्यस्थाची भूमिका निभावण्यासाठी बरादरची पाकिस्तानने सुटका केली होती.