सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु असून अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. पापुआ न्यू गिनी येथे सुरु असलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद उमटले. शनिवारी या आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुल्क आकारणी आणि पुरवठा साखळीत अडथळा आणणे यामध्ये दूरदर्शितेचा अभाव दिसतो. हे निर्णय यशस्वी होणार नाहीत असे म्हणाले.

जागतिक व्यापार संघटना अधिक भक्कम झाली पाहिजे हे सांगतानाच त्यांनी आपल्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाचे समर्थन केले. काही देशांनी हा सापळा आहे असे चित्र रंगवले आहे पण ते चुकीचे आहे असे जिनपिंग म्हणाले. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे भाषण झाले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना आर्थिक आणि राजनैतिक संबंधांसाठी चीनपेक्षा अमेरिका जास्त चांगला पर्याय आहे असे ते म्हणाले.

चीनकडून कर्ज उचलणाऱ्या देशांना त्यांनी इशारा दिला. अमेरिका कधीही आपल्या मित्र देशांना कर्जाच्या समुद्रात बुडवत नाही किंवा वन वे रोड बनवत नाही असे ते म्हणाले. दरम्यान अमेरिकेच्या व्यापारी मागण्यांना चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे पण चार ते पाच मुद्यांवर अजून एकमत झालेले नाही असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. चीनकडून आयात होणाऱ्या मालावर अमेरिकेने शुक्ल आकारणी केली आहे. चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या मालावर शुल्क आकारणी केली आहे. ट्रम्प चिनी मालावर अजूनही शुल्क आकारु शकतात असे पेन्स शनिवारी म्हणाले.