05 August 2020

News Flash

सईदवर कारवाई करूनही फरक पडला नसल्याचे अमेरिकेचे मत

पाकिस्तानातील वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संकोचाबाबत चिंता

पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान हे अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले असतानाच २००८ मधील मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या अटकेने लष्कर ए तोयबा व त्याच्या इतर संघटनांना काहीच फरक पडलेला नाही, अशी टीका अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानची मदत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने बंद केली असताना इम्रान यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी हाफिज याच्या अटकेची कारवाई केली होती.

ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हाफिज सईदला यापूर्वीही अटक करण्यात आली होती, पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. पाकिस्तानकडून आम्हाला दहशतवाद्यांवर ठोस कारवाई हवी आहे, त्यांच्याकडून तात्पुरत्या रंगसफेदीची अपेक्षा नाही.  संयुक्त   राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या हाफिज सईदला बुधवारी अटक करण्यात आली होती. त्याला अटक करण्याची ही सातवी वेळ होती. २००१ पासून त्याला अनेकदा अटक करण्यात आली, पण तरी त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतिहासाबाबत आमची दृष्टी स्वच्छ आहे. आम्ही कुठल्या भ्रमात नाही. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी दहशतवाद्यांना नेहमीच मदत केली आहे हे आम्हाला माहिती आहे. पाकिस्तानने दहशतवादी गटांच्या मालमत्ता जप्त करून काही पावले उचलली आहेत पण ती जुजबी आहेत. हाफिज सईद याला नजरकैदेतही ठेवण्यात आले होते पण आता त्याला सातव्यांदा अटक केली आहे तरी दहशतवादी कारवाया मात्र थांबलेल्या नाहीत. या दहशवाद्यांवर खटले भरून पाकिस्तानने शाश्वत कारवाई करावी. यापूर्वी त्याला अटक करून काही फरक पडलेला नाही त्यामुळे आता आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जैश ए महंमद, लष्कर ए  तोयबा व हक्कानी नेटवर्क यांच्या कारवायांबाबत अजूनही अमेरिकेला चिंता आहे. पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांच्या संबंधांची गुप्तताही आता संपली आहे.

पाकिस्तानातील वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संकोचाबाबत चिंता

पाकिस्तान वृत्तपत्र स्वातंत्र्यावर र्निबध घालण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून, आपण हा मुद्दा त्या देशाच्या सरकारकडे उपस्थित करू असे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका भेटीपूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे वक्तव्य केले आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच हा आमच्यासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. आम्ही हा मुद्दा मांडणे सुरूच ठेवू, असे हा अधिकारी म्हणाला. पत्रकारांवर सततचा दबाव आणि त्यांना असलेली दहशत मान्य होण्यासारखी नसल्याचे मत त्याने व्यक्त केले. अमेरिकेच्या दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळापुढे अमेरिकेचे नेते हा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात यात भर पडली आहे. आम्हाला या प्रवृत्तींबाबत अतिशय चिंता वाटते, असे हा अधिकारी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2019 1:03 am

Web Title: america pakistan hafiz saeed mpg 94
Next Stories
1 शीला दीक्षित यांचे निधन
2 ‘संस्कृत जाणल्याशिवाय भारताला ओळखणे कठीण’
3 ‘आई गमावल्याचे दुःख विसरता येत नाही’
Just Now!
X