अमेरिकेच्या संसदेत ग्रीन कार्डवरील मर्यादा हटवण्यासंबंधी सादर करण्यात आलेले विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सध्या ग्रीन कार्डसाठी सात टक्क्यांची मर्यादा आहे. याचा फायदा अमेरिकेत जाणाऱ्या हजारो भारतीय आयटी इंजिनिअर्सना होणार आहे. ग्रीन कार्डमुळे संबंधित व्यक्तीला कायम स्वरूपी अमेरिकेत वास्तव्य करण्याची परवानगी मिळते. आता हे विधेयक मंजुर झाल्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या भारतीयांसह अन्य देशांच्या नागरिकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फेअरनेस ऑफ हाय स्किल्ड इमिग्रेंट्स अॅक्ट, 2019 / एचआर 1044 नावाचे हे विधेयक अमेरिकेच्या संसदेत 365 विरूद्ध 65 अशा संख्याबळाने मंजुर करण्यात आले.

सध्या अमेरिकेत एका वर्षात कुटुंबाला देण्यात येणाऱ्या प्रवासी व्हिसाच्या संख्येला मर्यादित ठेवण्यात आले आहे. तसेच सध्या अमेरिकेकडून एका देशासाठी केवळ सात टक्के व्हिसा देण्यात येत आहेत. परंतु नव्या विधेयकात ही टक्केवारी वाढवून 15 टक्के करण्यात आली आहे.

तसेच कामानिमित्त अमेरिकेत जाणाऱ्यांना सात टक्के व्हिसा देण्यात येत होते. परंतु नव्या विधेयकानुसार ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. या विधेयकाचा कायदा होण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. तसेच त्यापूर्वी त्याला अमेरिकन सीनेटचीही मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांची संख्या सर्वाधिक आहे.