अमेरिकेत न्यूयॉर्कमधील लष्करी तळावर पिझा डिलीवरी करायला गेलेल्या व्यक्तीवर देश सोडण्याची वेळ आली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल पिझा डिलीवरीचा आणि देश सोडण्याचा काय संबंध? त्याचे झाले असे कि, पाबलो व्हिलाव्हायसेनसियो अमेरिकेमध्ये पिझा डिलीवरीचे काम करतात. शुक्रवारी ते न्यूयॉर्कमधील फोर्ट हॅमिलटन लष्करी तळावर पिझाची डिलीवरी पोहोचवण्यासाठी गेले होते. यापूर्वी सुद्धा त्यांनी या लष्करी तळावर पिझा डिलीवरी केली आहे.

पण यावेळी त्यांच्याकडे तळावर तैनात असलेल्या एका सैनिकाने अमेरिकेच्या नागरिकत्वाचा पुरावा मागितला. पण त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वाचे कोणतेही कागदपत्र सादर करता आले नाही. त्यानंतर सैनिकाने अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिथे बोलावले व त्यांच्या ताब्यात पाबलो यांना दिले. पाबलो मूळचे इक्वाडोरचे असून सन २०१० पासून ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांना दोन मुली आहेत.

यापूर्वी जेव्हा पाबलो न्यूयॉर्कमधील तळावर डिलीवरी पोहोचवण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्यांचे न्यूयॉर्कचे ओळखपत्र दाखवले. त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची सक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी ते सहीसलामत सुटत होते. पाबलो यांची पत्नी अमेरिकन नागरीक आहे. आता काही होणे शक्य नसल्याचे वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला देश सोडावा लागेल असे स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नीने सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदापणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.