जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अनेक देश युद्धपातळीवर करोनावरील लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी करोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं. भारतातही काही करोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन रेड क्रॉसच्या मुख्यालयाचा गुरूवारी दौरा केला. त्यावेळी त्यांनी करोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं. “प्रशासनानं करोना विषाणूवरील उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. जर तुम्ही करोनामुक्त झाला असाल तर इतरांचं जीवन वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करा. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. दरम्यान, करोनाचा सामना करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीची मदत होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. याद्वारे करोनाचा सामान्य रुग्ण ५ दिवस आधीच करोनातून बाहेर येत असल्याचंही समोर आलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४६.२९ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २२ लाखांपेक्षा अधिक जण करनोमुक्त झाले आहेत. तर अमेरिकेत सद्यस्थितीत २१.९७ लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत.

काय आहे कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपी?

कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरलं जातं. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचं अमेरिकन जर्नलमध्ये म्हटलं आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येतं. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितलं होतं.

या थेरपीचा यापूर्वी कधी वापर झाला आहे?

तिचा यापूर्वी इबोलामध्ये वापर झाला आहे. इबोलावर कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते, तेव्हा या थेरपीच्या वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शत तत्त्वे घालून दिली होती.