अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी H-1B व्हिसावर २०२० च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली. २४ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. करोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अमेरिकेतील लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयावर मात्र गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“सरकारच्या निर्णयामुळे मी निराश आहे आणि स्थलांतरितांच्या पाठीशी उभा राहणार आहे,” असं पिचाई म्हणाले. “अमेरिकेच्या आर्थिक यशामध्ये या स्थलांतरीतांचं मोठं योगदान आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेनं जागतिक आघाडी घेतली. आजच्या सरकारने केलेल्या घोषणेमुळे मी निराश आहे. आम्ही स्थलांतरितांसोबत उभे राहू आणि सर्वांसाठी संधींचा विस्तार करू,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- अमेरिकेत जाण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना झटका, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

H-1B व्हिसावर निर्बंध आणल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मात्र मोठा फटका बसणार आहे. भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. याचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल, ज्या कंपन्यांना १ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष २०२१ साठी अमेरिकी सरकारकडून H-1B व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार आहे.

करोना संकटामुळे अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसावर निर्बंध आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासह अन्य अनेक श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध आणले आहेत.