अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नाही. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी१-बी२) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील ‘बर्थ टूरिझम’ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांचा संबंध आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही आहे. तसंच ‘बर्थ टूरिझम’द्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करणंदेखील यात समाविष्ट असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं कठीण होणार आहे. गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचं असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचं कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागणार आहे. ट्रम्प प्रशासन सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या स्थलांतरावर बंदी आणत आहे. तसंच जन्मत: मिळणाऱ्या नागरिकत्वावरही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. रशिया आणि चीनसारख्या देशांमधून अनेक महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

‘बर्थ टूरिझम’साठी द्यावे लागतात ८० हजार डॉलर्स
अनेक अमेरिकन कंपन्या यासाठी जाहिरात देत असतात. तसंच वैद्यकीय सेवा आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी तब्बल ८० हजार डॉलर्स घेत असतात. अनेक गर्भवती महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असतात. परंतु याची कोणतीही माहिती अमेरिकेकडे उपलब्ध नाही. २०१२ मध्ये ३६ हजार गर्भवती महिलांनी आपल्या मुलांना अमेरिकेत जन्म दिला आणि त्यानंतर त्या परतल्या असल्याची माहिती ‘ग्रुप सेंटर फॉर इमीग्रेशन स्टडीज’कडून देण्यात आली आहे.