जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. सध्या अमेरिकेतही करोनाचं संकट वाढलं आहे. तर मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान समोर आलं आहे. “करोनाच्या संकटामध्ये प्रशासनाने मृतांचा आकडा १ लाखांवर जरी ठेवला तरी मोठं काम झालं,” अस वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेतील तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

“देशात सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य सुविधा जर राबवल्या नसत्या तर २२ लाख लोकांच्या मृत्यू होण्याचा धोका होता. परंतु सध्या आपले प्रशासन चांगलं काम करत आहे. त्यामुळे १ लाख लोकांचा मृत्यू जरी झाला तरी प्रशासनानं चांगलं काम केलं असं म्हणावं लागेल,” असं ट्रम्प यांनी नमूद केलं. त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमधून अमेरिकेतील नागरिकांशी संवाद साधला.

“करोनाचं अमेरिकेवर आलेलं मोठं संकट आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशसनाची कसोटी लागत आहे. याव्यतिरिक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाच्या प्राणांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे असं म्हणत याचा आणखी तडाखा आपल्याला बसायचा आहे,” असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील शटडाऊन १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णयही ट्रम्प यांनी यावेळी जाहीर केला.