अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्टय़ा दुभंगल्याचे स्पष्ट झालं आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले आहेत. त्यामुळे निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला होता. यावरून डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण असतील याचा निर्णय देशातील जनता करणारणार आहे. त्यासाठी कोणताही दावा केला जाऊ शकत नाही, असं बायडेन म्हणाले. “सत्ता घेतली जाऊ शकत नाही आणि ना त्यावर दावा केला जाऊ शकतो. ती जनतेकडून मिळते आणि त्यांची इच्छा काय आहे यानुसार देशाचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे ठरेल,” असं बायडेन म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना आपला विजय झाला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. “खरं सांगायचं तर आम्ही निवडणूक जिंकली आहे,” असं ट्रम्प म्हणाले होते.

घोटाळ्याचा आरोप

मतदारांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांच्या बाजूने तर करोना साथीच्या मुद्दय़ावर बायडेन यांच्या बाजूने कौल दिला आहे. आधी झालेले दहा कोटी मतदान यात निर्णायक आहे कारण त्यात बरीच मते बायडेन यांना मिळाल्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी बुधवारी असा दावा केला, की अमेरिकी लोकांवर हा निवडणूक घोटाळा लादण्यात आला असून आपण ही निवडणूक आता न्यायालयातच लढू. वॉशिंग्टन स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे २ वाजता आपण निवडणूक जिंकल्याचा दावा करून त्यांनी साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडलं.