पेट्रोरसायन उद्योगातील  कंपन्यांना फटका
अमेरिकेने या आठवडय़ाभरात सलग तिसऱ्यांदा इराणवर र्निबध लादले आहेत. ऑटोमोबाइल उद्योगापाठोपाठ आता चलनावरही र्निबध घालून अमेरिकेने इराणची कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले आहे. इराण राबवत असलेल्या अणू कार्यक्रमाचा नाद सोडावा यासाठी अमेरिकेने दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्याचे बोलले जाते.
इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने प्रथमच थेट त्या देशाच्या रियाल चलनावर र्निबध घातले असून इराणच्या बाहेर त्याच्या वापर रोखून धरण्याचा अमेरिकेने प्रयत्न सुरू केला आहे.
शिवाय इराणचे चलन असलेल्या रियालच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही अमेरिकेने दिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हा नवीन आदेश दिला आहे. ओबामा प्रशासनाने आतापर्यंत नऊ प्रकारचे र्निबध इराणवर लादले आहे. गेल्या आठवडय़ात अमेरिकेने इराणच्या पेट्रोरसायन उद्योगातील ५० पेक्षा अधिक कंपन्यांवर र्निबध घातले आहेत. या कारवाईअंतर्गत अमेरिकेने आता थेट इराणच्या चलनावर र्निबध घातल्याची माहिती व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम प्रवक्ते जे कार्नी यांनी सोमवारी स्पष्ट केले. या र्निबधांचा निषेध करताना इराणने अमेरिकेला टक्कर देण्याचा इरादा व्यक्त केला आहे.