03 March 2021

News Flash

चंद्र मोहिमांमध्ये अमेरिका २६ तर रशिया १४ वेळा अपयशी

अवकाश इतिहासात अपयशामध्ये पुढचे यश दडलेले असते. अमेरिका, रशियासारखे देश अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत.

चांद्रयान-२ मोहिमेतंर्गत विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्यात भले भारताला अपयश आले असेल पण त्याने निराश होण्याचे कारण नाही. कारण अवकाश इतिहासात अपयशामध्ये पुढचे यश दडलेले असते. अमेरिका, रशियासारखे देश अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना मार्गावरुन भरकटले.

भारतचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरला आहे असे नाही तर अमेरिका, रशिया या देशांना देखील चांद्र मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात चंद्र मोहिमांमध्ये यश मिळण्याचे प्रमाण खूप कमी होते. अमेरिकेला एकूण चंद्र मोहिमांपैकी २६ वेळा तर रशियाला १४ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

भारताला खूप काही शिकायला मिळाले

सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले असले तरी त्यातून भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी भारताला खूप काही शिकायला मिळणार आहे. चंद्रयान-२ मोहिम पूर्णपणे अपयशी ठरलेली नाही. कारण ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे.

१९५० च्या दशकात सुरु झाली स्पर्धा
१९५० च्या दशकात चंद्राला स्पर्श करण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याकाळात अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ताच त्या स्पर्धेमध्ये होत्या. १९५० च्या दशकात एकूण १४ चंद्र मोहिमा झाल्या. त्यात अमेरिकेला सात पैकी एक तर रशियाला सात पैकी तीन मोहिमांमध्ये यश मिळाले.

सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला. रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.

या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवी पाऊल चंद्रावर पडले. १९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावर जाण्याची ही स्पर्धा थांबली. त्यानंतर जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 7:06 pm

Web Title: america russia india moon mission isro dmp 82
Next Stories
1 तेराशे ग्राहकांची कार्ड डिटेल्स लक्षात ठेऊन ऑनलाईन खरेदी करणाऱ्या कॅशिअरला अटक
2 वाहन उद्योगावर बीएस-6, ओला-उबरचा परिणाम : अर्थमंत्री सीतारमन
3 परदेशी विद्यार्थीनीचा आयआयटीमधील प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप
Just Now!
X