संपूर्ण जगात एकटय़ा अमेरिकेकडूनच १८ टक्के कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. अशा परिस्थितीत हवामान बदल आणि साधनांची कमतरता यासंदर्भात भारत आणि चीनसमवेत अमेरिकेने अर्थपूर्ण संवाद साधून तसे बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसच्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर अमेरिकेकडून सध्या जवळजवळ १८ टक्के कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन केले जाते. अन्य देशांमध्येही हे प्रमाण वाढते असल्यामुळे सन २०३५ पर्यंत हे प्रमाण १५ टक्क्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. भारत आणि चीनसारख्या वाढत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनीही कार्बनच्या उत्सर्जनात घट करण्याची गरज आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरचे प्रयत्न काहीसे कमी पडत असल्याचेही मत मांडण्यात आले आहे.
याच संदर्भात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जानेवारी महिन्यात आपला वार्षिक अहवाल सादर केला होता. पुढील १० वर्षांत कार्बनच्या वाढत्या उत्सर्जनामुळे जागतिक स्तरावरील हवामानास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा या अहवालामध्ये देण्यात आला आहे.
हवामानात होणाऱ्या या बदलांची योग्य ती दखल न घेता आवश्यक त्या सुधारणा न केल्यास संपूर्ण जगभरात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर विपरीत परिणाम होतील, असेही या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.