अमेरिकेची पाकिस्तानला सूचना
पाकिस्तानच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून, दक्षिण आशियात आण्विक सुरक्षा व सामरिक स्थैर्याबाबतचा धोका वाढू शकेल अशा कुठल्याही घडामोडी टाळण्याचा तसेच या कार्यक्रमांना आवर घालण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रागारासंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींबाबत तुम्हाला असलेल्या काळजीची आम्हाला कल्पना आहे. आण्विक यंत्रणांचा पाठपुराव्यासह पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रमाची गती आणि व्याप्ती यांच्यामुळे आम्हाला अधिक काळजी वाटते, असे परराष्ट्र व्यवहार समितीने पाकिस्तानबाबत आयोजित केलेल्या एका सुनावणीत अफगाणिस्तान व पाकिस्तानबाबत अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड ओल्सन यांनी खासदारांना सांगितले.
आग्नेय आशियातील पारंपरिक संघर्ष अधिक तीव्र होऊन त्यात आण्विक वापराची भर पडेल, तसेच सुरक्षाविषयक आव्हाने वाढून सोबतच शस्त्रांचे भांडारही वाढेल याची आम्हाला चिंता वाटते. या संदर्भात आमचा पाकिस्तानच्या सर्वोच्च स्तरावरील लोकांशी सक्रिय संवाद झाला असून, त्यात आम्ही आमच्या नेमक्या चिंता काय याची त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे, असे काँग्रेसमन ब्रायन हिग्गिन्स यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ओल्सन म्हणाले.
इतर अण्वस्त्र-सक्षम देशांप्रमाणे आम्ही पाकिस्तानलाही त्यांची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र विकास मर्यादेत ठेवण्यास सांगितले असून, ज्यामुळे आण्विक सुरक्षा किंवा सामरिक स्थैर्य धोक्यात येईल अशा कुठल्याही घडामोडी टाळण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. थोडक्यात, पाकिस्तानला त्यांचे आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम आटोक्यात ठेवण्यास अमेरिकेने सांगितले आहे, अशी माहिती ओल्सन यांनी दिली.
इस्लामाबाद भारतासोबतचे संबंध सुधारण्यात प्रामाणिक असल्याचे दिसत नसून, उलट त्याने शस्त्रनिर्मितीचा वेग वाढवला आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी सूचना अमेरिकी काँग्रेसच्या खासदारांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर ओल्सन यांनी हे विचार मांडले.
आपल्याला भारताकडून अस्तित्वाची भीती असल्याचे सांगून पाकिस्तान शस्त्रस्पर्धेत उतरलेला आहे. ‘कार्नेजी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडे येत्या दशकात ३५० अण्वस्त्रे असतील. यामुळे भारत, फ्रान्स, चीन व ब्रिटन यांना मागे टाकून पाकिस्तान जगातील तिसरी सर्वात मोठी आण्विक शक्ती बनेल, असेही ओल्सन यांनी नमूद केले.