काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर भारताकडून चालढकल केली जाते, असा कांगावा पाकिस्तानने केला असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा अमेरिकेने मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.
हेगमध्ये दोन दिवसीय आण्विक शिखर परिषदेच्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ बोलत होते. काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जेव्हा पाकिस्तानने पुढाकार घेतला त्या त्या वेळी भारताने चालढकल केली, असा कांगावा शरीफ यांनी केला. सदर प्रश्न सोडविण्यासाठी त्रयस्थाने आम्हाला मदत करावी, असेही आम्ही स्पष्ट केले आहे. परंतु भारत त्यासाठीही तयार नाही, या स्थितीत चर्चा कशी सुरू होणार, आता अमेरिकेनेही त्याचा विचार करावा, असे आपण स्पष्ट केल्याचे शरीफ म्हणाले.