काश्मीर प्रश्नावर आमच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नसून काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप केला जाणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्तया जेन साकी यांनी त्यांच्या पहिल्याच ट्विटर संवादात सांगितले की, आमची भूमिका बदललेली नाही. भारत-अमेरिका यांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, त्याला आमचा पाठिंबा राहील.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात वारंवार काश्मीर प्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ओबामा प्रशासनाकडे केली होती, त्या पाश्र्वभूमीवर साकी यांनी ही मागणी फेटाळून लावली. शरीफ यांच्या दौऱ्याच्या अगोदरच ओबामा प्रशासनाने असे सांगितले होते की, काश्मीर प्रश्नी अमेरिकेच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नसून काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय संबंधात मोडणारा प्रश्न आहे. तो त्या देशांनीच चर्चेतून सोडवावा.
‘यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ पीस’ या संस्थेत शरीफ यांनी असे आवाहन केले होते की, अमेरिकेची भारतात चांगली वट आहे, त्यामुळे त्यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यात मध्यस्थी करावी. अमेरिकेचा भारतावरील प्रभाव वाढत आहे व त्यामुळे काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी, असेही शरीफ म्हणाले होते. परराष्ट्र खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंधांना आमचा पाठिंबा आहे, ते चालू रहावेत व संवादाची प्रक्रिया दोन्ही देशात सुरू रहावी यासाठी अमेरिका प्रयत्न करीतच आहे.