भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान अमेरिकेच्या जवानांच्या बँड पथकाने भारताचं राष्ट्रगीत जन गण मन वाजवल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचा हा संकेत असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी वॉशिंग्टन येथे भारत अमेरिकेदरम्यान पार पडलेल्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान दोन्ही देशांचे जवान आसाम रेजिमेंटचे योद्धा बदलू राम यांच्या आठवणीत तयार करण्यात आलेल्या गाणावर थिरकताना दिसले होते. त्यानंतर आता हा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

हे दोन्ही व्हिडीओ भारत अमेरिकेदरम्यान वाढत्या मैत्रीचे प्रतीक असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागल्या आहेत. 15 सप्टेंबर रोजी भारत आणि अमेरिकेच्या जवानांनी अमेरिकेतील संयुक्त बेस लुईस, मॅककॉर्ड येथे युद्ध अभ्यास केला. यानंतर दोन्ही देशांचे जवान आसाम रेजिमेंटचे मार्चिंग गीत ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे है’ यावर थिरकताना पहायला मिळाले.

हे मार्चिंग गीत आसाम रेजिमेंटचे रायफलमॅन बदलूराम यांच्या आठवणीत तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान बदलूराम शहीद झाले होते. परंतु त्यानंतरही त्यांचे नाव हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावावर मिळणारे धान्य येत राहिले. जापानच्या सैन्याने जेव्हा भारतीय सैन्याच्या अन्नधान्यावर टाच आणली तेव्हा बदलूराम यांच्या नावे आलेल्या अन्नधान्यावर सैनिकांना काम चालवावे लागले. युद्ध जिंकल्यानंतर त्यांच्या आठवणीत हे गाणं तयार करण्यात आलं.