अमेरिकेत फ्लोरिडातील ओरलँडो येथे समलिंगींच्या नाइट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात पन्नास जण मरण पावल्याची घटना ताजी असतानाच इंडियाना येथील एका व्यक्तीस तीन रायफली व स्फोटके बनवण्याच्या रसायनांसह दक्षिण कॅलिफोर्नियात अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले, की तो वेस्ट हॉलिवूड येथे ‘गे प्राइड परेड’ येथे वार्षिक कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे निघाला होता पण कुणाला ठार मारण्याचा इरादा नव्हता. सांता मोनिका येथे अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव जेम्स वेस्ले हॉवेल असे असून तो वीस वर्षांचा आहे. त्याचे मूळ गाव जेफरसनव्हिले हे आहे. दोन घटनांमध्ये कुठलाही संबंध जोडता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉस एंजल्स येथील प्राइड इव्हेंट कार्यक्रम कडक सुरक्षेत ठरल्याप्रमाणे झाला. असे लॉस एंजल्सचे महापौर एरिक गारसेटी यांनी सांगितले. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. हॉवेल याला पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली. रहिवाशांनी पोलिसांना त्याचे संशयास्पद वर्तन पाहून फोन केला होता. त्यामुळे तो पकडला गेला. हॉवेल हा अ‍ॅक्युला सेडान गाडीतून आला होता व त्याच्या गाडीच्या आसनावर रायफल सापडली, असे सांता मोनिकाचे पोलिस लेफ्टनंट सॉल रॉड्रिग्युज यांनी सांगितले. त्यानंतर मोटारीची तपासणी करण्यात आली असता आणखी दोन रायफली सापडल्या. त्याशिवाय काडतुसे व स्फोटक पदार्थही सापडले आहेत. सांता मोनिकाच्या पोलिस प्रमुख जॅकलिन सीब्रुक्स यांनी सांगितले, की हॉवेल याने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले, की गे प्राइड इव्हेट येथे कुणालाही इजा करण्याचा त्याचा इरादा नव्हता. दरम्यान, या प्रकरणी एफबीआय पुढील तपास करीत आहे. हॉवेल याच्या फेसबुक पेजवर त्याच्या पांढऱ्या रंगाच्या व्हाइट अ‍ॅकुरा गाडीची छायाचित्रे दिसत  आहेत. त्याचे समलिंगींशी किंवा राजकीय व्यक्तींशी कुठलेही वैमनस्य नसल्याचे दिसत आहे

पण त्याने मारीजुआनाचा वापर कायदेशीर करण्याची मागणी त्यात केली आहे. एअर फिल्टर तयार करणाऱ्या कंपनीत हॉवेल हा लेखापरीक्षक म्हणून काम करीत आहे.