News Flash

अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी

 बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती

व्हॅन हॉर्न : अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले.

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती.

बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते.  बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न  पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

त्यासाठी लिलावाची बोली झाली होती. ब्लू ओरिजिन ही कंपनी वॉशिंग्टनमधील केंटमध्ये इ.स २००० मध्ये स्थापन झाली असून अ‍ॅमेझॉनच्या सियाटलमधील मुख्यालयाजवळच हे ठिकाण आहे. ब्लू ओरिजिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब स्मिथ यांनी सांगितले की, आणखी दोन प्रवाशांना या वर्षी अवकाशवारी घडवली जाणार आहे. यातील अग्निबाण व कॅप्सूल फेरवापराचे असून त्याचाच वापर आधी केला होता. व्हर्जिन गॅलक्टिकच्या अवकाशवारीसाठी ६०० जणांचे आरक्षण असून प्रत्येक तिकिटाची किंमत अडीच लाख डॉलर्स आहे. २००४ मध्ये ही कंपनी स्थापन झाली होती. त्यानंतर त्यांनी अलीकडेच न्यू मेक्सिकोतून चार जणांना अवकाशात नेले होते त्यात ब्रॅन्सन यांचाही समावेश होता. ब्लू ओरिजिन कंपनीने २०१५ पासून मानवरहित चाचण्या सुरू केल्या होत्या व अलीकडे त्यांनी मानवाला अवकाशवारी घडवण्याचा इरादा जाहीर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:14 am

Web Title: american billionaire businessman jeff bezos blue origin vacation new shepard to the rocket akp 94
Next Stories
1 केरळ सरकारला कारवाईचा इशारा
2 मिशीगनची वैदेही डोंगरे ‘मिस इंडिया यूएसए’
3 करोना मृत्यूंचा आकडा लपवलेला नाही!