अमेरिकेतले भारतीय वंशाचे सर्जन विवेक मूर्ती यांनी करोनासंदर्भातल्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात अडकले आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या संकटाला सामोरं जायला हवं. आणि या संदर्भात काही गोष्टीही जाणून घ्यायला हव्यात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारी माहिती किती धोकादायक ठरु शकते याबद्दलही डॉ. मूर्ती यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणतात, चुकीची माहिती हाच एक विषाणू आहे जो लोकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचवत आहे. या माहितीवर विश्वास ठेवून अनेकजण स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.

अशा महामारीच्या काळात माहिती हे सर्वात प्रभावी माध्यम ठरतं. जर लोकांना योग्य माहिती मिळाली तर ते स्वतःचं संरक्षण योग्य पद्धतीने करु शकतात. उदाहरण देताना ते म्हणतात की, सरकारने किंवा खासगी कंपन्यांनी मास्क, आवश्यक त्या लसी तर बनवल्या पण लोकांना जर त्याबद्दल चुकीची माहिती मिळत असेल तर त्यांचा काहीही उपयोग होणार नाही.

अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये करोनामुळे खूप हानी झाली आहे. इथलं बाधितांचं आणि मृतांचं प्रमाणही मोठं आहे. अमेरिका या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही देशांना चुकीच्या माहितीचाही मोठा फटका बसलेला आहे.