भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेजवळ मागील काही दिवसांपासून सुरु असणारा सीमावाद हा जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. याच कालावधीमध्ये मागील काही आठवड्यांमध्ये जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी चीनच जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिका आणि चीनमधील संबंधही कमालीचे ताणले गेले आहेत. भारत आणि चीन वादामध्ये अमेरिकेने कायमच भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर पॅसिफिक महासागरामध्ये मागील तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच विमानवाहू नौका तैनात केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या तीन विमानवाहू नौका पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या समुद्र सीमांपासून काही अंतरावर गस्त घालत आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. अमेरिकेने नियुक्त केलेल्या या युद्ध नौका हे चीनसाठी मोठे आव्हान असल्याचे सांगण्यात येत आहे. काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्येच आता चीन आणि भारतामधील तणाव वाढल्याने ही जहाजे तैनात करण्यात आली आहेत.

आणखी वाचा- पँगाँग टीएसओमुळे परिस्थिती चिघळणार? चीनने अजूनपर्यंत नाही दिला प्रतिसाद

अमेरिकन नौसेनेची क्रूझर जहाजे, विध्वंसक जहाजे, युद्ध विमाने आणि इतर सहाय्यक विमानांनी सुसज्ज अशा तीन युद्धनौका पॅसिफिक महासागरामध्ये दिसून आल्या आहेत. अमेरिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर चीनवर रोज टीका आणि आरोप केले जात आहेत. अमेरिकेने हाँगकाँगमध्ये लागू केलेल्या वादग्रस्त कायद्यासंदर्भात आणि दक्षिण चीनच्या समुद्रामधील मानवनिर्मित बेटांवर लष्कर नियुक्त करण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेत टीका केली आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटर्जिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजअंतर्गत चीनमधील विजनिर्मिती प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे बोनी ग्लेजर यांनी, “चीनमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांमधील लेखांमधून अमेरिकेत करोनामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच अमेरिकेची लष्करी तयारीही तितकीशी सशक्त नाहीय. म्हणूनच अशापद्धतीने पॅसिफिक महासागरामध्ये युद्धनौका तैनात करुन अमेरिका आपली तयारी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असून याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिजे जावू नये असे संकेत दिले जात आहेत,” असं मत व्यक्त केलं. “अमेरिका आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहे किंवा अमेरिकेमध्ये करोनामुळे अस्थिरता निर्माण झाल्याचे हे संकेत आहेत अशापद्धतीने चीन या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करेल,” असंही ग्लेजर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- नेपाळसोबत उत्तम संबंध, भारत-चीन सीमेवरील परिस्थितीही नियंत्रणात : लष्कर प्रमुख

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने ते चीनवर यासंदर्भात आगपाखड करत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. अमेरिकेने मागील काही आठवड्यांमध्ये चीनसंबंधित अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे. यामध्ये अगदी चीनी कंपन्या, चीनमधील विद्यार्थी, चीनीशी संबंधित संशोधन यावर बंदी घालण्यात आली आहे. चीन हा आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतो असं पॅण्टागॉनमधील सुरक्षा तज्ज्ञांचे आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पॅसिफिक महासागारामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासंदर्भातील तयारी करण्याबद्दलचे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरामध्ये चीनचा आर्थिक दबदबा वाढत असून यासंदर्भातही अमेरिकेतील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.