संतापलेल्या ट्रम्प यांची प्रतिक्रिया

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या टीकेने संतापलेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. किम म्हणजे अगदी वेडा माणूस असून आगळीक केल्यास त्याला अभूतपूर्व सत्त्वपरीक्षेला तोंड द्यावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन हा नक्कीच एक वेडा माणूस आहे, ज्याला आपल्याच देशवासीयांना उपाशी ठेवण्यात किंवा ठार मारण्यात काही वावगे वाटत नाही. मात्र त्याला आजवर कधी नाही एवढय़ा मोठय़ा सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प आणि किम यांच्यातील वाग्युद्धाने आता नवी पातळी गाठली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी उत्तर कोरिया व किम यांच्यावर जोरदार टीका केली होती. किम यांनी अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांचा हव्यास सोडला नाही आणि अमेरिका किंवा मित्रराष्ट्रांवर हल्ला केल्यास संपूर्ण उत्तर कोरिया नष्ट करावा लागेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.  ट्रम्प यांनी संपूर्ण जगासमोर माझ्या देशाचा व माझा अपमान केला. ट्रम्प यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यांना त्यांच्या साहसाची मोठी किंमत मोजावी लागेल, असे किम म्हणाले होते.

ट्रम्प यांचे संतुलन बिघडले – किम जोंग उन

सोल : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन घसरले असून उत्तर कोरियाला नष्ट करण्याची भाषा त्यांना फार महागात पडेल, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी दिला. पॅसिफिक महासागरावर हायड्रोजन बॉम्ब टाकला जाऊ शकतो, असा इशारा त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. अमेरिकेने उत्तर कोरियावर कडक निर्बंध लागू केल्यानंतर ट्रम्प यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करताना किम यांनी सांगितले,की ट्रम्प यांनी माझा अपमान केला आहे, सर्व जगासमोर माझ्या देशाचा अपमान केला, युद्धाची  भाषा केली आहे. जगाचे सर्वसत्ताधीश समजणाऱ्या ट्रम्प यांना उत्तर कोरियाला नष्ट करण्याची भाषा महागात पडले. ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, पण त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी सांगितले की, आम्ही पॅसिफिक सागरात हायड्रोजन बॉम्ब टाकू. पण नेमका कोणता बॉम्ब टाकायचा ते आमचे नेतेच ठरवतील.