अमेरिकी तरुणाईच्या क्षेत्रात सोळावे नाही, तर सतरावे वर्ष धोक्याचे मानले जाते. बंडखोरी आणि शारीर-मानसिक बदलांच्या या अवस्थेत बंडखोर-विध्वंसक वृत्तींच्या आवृत्त्याच तरुणाईमध्ये एकसमान दिसून येतात. या मार्गाना टाळून अमेरिकेतील एका सतरा वर्षीय मुलाने २३ भाषांमध्ये प्रावीण्य प्राप्त करून नवा आदर्श यू टय़ुबप्रेमी पिढीसमोर ठेवला आहे. टिमोथी डोनर असे या तरुणाचे नाव असून त्याच्या भाषा संग्रहामध्ये हिंदीनेदेखील मानाचे स्थान मिळविले आहे.
नवे काय?
नाच-गाण्यांच्या अचाट गोष्टी, विचित्र विक्रम यांच्यामधून लोकप्रिय होण्यासाठी यू टय़ुब हे गेल्या काही वर्षांत सर्वात सोपे व्यासपीठ बनले आहे. टिमोथी डोनर याने यू टय़ुबवर आपल्या बहुभाषिक व्यवहारांची कसरत पोस्ट केली. या व्हिडीओमध्ये टिमोथी २० भाषा बोलताना दिसत आहे. अल्पावधीच त्याच्या व्हिडीओमधील भाषाकौशल्याने तरुणाईला वेडावून टाकले. भाषिक तज्ज्ञांनी त्याच्यामधील या गुणांना गौरविले. जगभरात अल्पावधीत कोणतीही भाषा शिकू शकण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना करण्यात आली आहे. प्रत्येक व्हिडीओला मिळणारा हजारो यूझर्सचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यांनी त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. हिंदीव्यतिरिक्त अरेबिक, क्रोएशियन, डच, फारसी, फ्रेन्च, जर्मन, हौसा, हिब्रू, इंडोनेशियन, इसिझोसा, इटालियन, मांडरिन,ओजिब्वे, पर्शियन, पश्तू, रशियन, स्पॅनिश, स्वाहिली, तुर्की, यिडिश, वॉलॉफ आणि इंग्रजी भाषा हा तरुण लीलया बोलू शकतो.
आहे काय?
डोनर हिब्रू भाषा शिकत असताना त्याला त्याच्यातील भाषिक आकलनाच्या क्षमतेची जाणीव झाली. त्याने आठवडाभरात या भाषेवर प्रभुत्व मिळवल्याचे हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. डोनरने इतर भाषांमध्ये कसरती करण्यासाठी वास्तवातील अनेक गोष्टींना भिडण्याचे ठरविले. न्यूयॉर्क शहरातील टॅक्सी चालक, रेस्टॉरण्टमधील बहुराष्ट्रीय, बहुभाषीय कर्मचारी यांच्याशी मैत्री करत, ई-मेल व सोशल नेटवर्किंग साईट्सवरून त्याने आपल्या भाषाज्ञानाचा विस्तार केला.
नवे संशोधन : व्याकरण पक्के होते वयाच्या दुसऱ्या वर्षी
वॉशिंग्टन:  मूलभूत भाषिक संकल्पनांची जाणीव असणाऱ्या थोडय़ा लोकांखेरीज बहुतांश व्यक्तींना व्याकरण हा भाग परीक्षेतील सर्वात अवघड वाटणारा असतो. व्याकरणात शून्य असल्याचे कौतुकाने सांगणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक असते. मात्र सर्व व्याकरणशत्रूंना अचंबित करणारे नवे संशोधन पुढे आले आहे. यानुसार वयाच्या दुसऱ्या वर्षांतच व्याकरणाचे मूलभूत नियम लहान मूल आपसूक आत्मसात करते. बोबडे बोल नीट होऊ लागण्याच्या काळात ही व्याकरण रचना आपोआप तयार होते, असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील अभ्यासकांनी म्हटले आहे.