तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन जीवघेणे असते, पण ते टाळले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. अमेरिकेत धूम्रपानविरोधी कडक उपाययोजना पन्नास वर्षांपूर्वी राबवण्यात आल्या होत्या, त्यामुळे किमान ८० लाख लोकांचे प्राण वाचले असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे.
‘येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली गणिती प्रारूपाच्या आधारे करण्यात आलेल्या संशोधनात पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकी महाशल्यचिकित्सकांनी राबवलेल्या धोरणांचे दीर्घकालीन परिणाम तपासण्यात आले. त्या वेळी आखण्यात आलेल्या धोरणाने लोकांच्या दृष्टिकोनात फरक पडला व धूम्रपान करण्याच्या सवयीतही फरक दिसून आला असे या संशोधकांचे म्हणणे आहे. यातील एक संशोधक असलेले येल कर्करोग विद्यापीठ केंद्राचे थिओडोर आर. होलफोर्ड व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे म्हटले आहे, की १७.६ दशलक्ष अमेरिकी लोक १९६४पासून धूम्रपानाच्या व्यसनामुळे मरण पावले, तर ८० लाख लोकांचे प्राण हे तंबाखू नियंत्रण धोरणामुळे वाचू शकले. ११ जानेवारी १९६४ मध्ये तंबाखू नियंत्रणासाठी एक अहवाल तयार करण्यात आला होता व त्याची अंमलबजावणीही करण्यात आली होती. ज्यांचे प्राण वाचले त्यात ५३ लाख पुरुष तर २७ लाख स्त्रिया होत्या. त्यामुळे गणितीय अंदाज करता १५.७ कोटी वर्षे इतके आयुष्य वाचले तर प्रत्येकाला १९.६ वर्षे जास्त आयुष्य मिळाले असे या संशोधकांचे मत आहे. या धोरणामुळे ३१ टक्के अकाली मृत्यू वाचले, पण जास्त उत्साहवर्धक बाब अशी की, त्यानंतरच्या काळातील पहिल्या दशकात मृत्यूचे प्रमाण २००४-२०१२ या काळातील अंदाजापेक्षा ११ टक्के कमी झाले तर नंतर ते ४८ टक्के कमी झाले.