भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (१७ मार्च २०१९ रोजी) निधन झाले. पर्रिकरांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. मंगळवारी (१८ मार्च २०१९) मीरामार समुद्रकिनाऱ्यावर चाहत्यांच्या अलोट गर्दीत पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यता आला. आपल्या साधेपणासाठी आणि कामसाठी ओळखले जाणारे पर्रिकर हे सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. याचीच प्रचिती त्यांच्या निधनानंतरही येत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेठी मतदारसंघामधील दोन गावातील गावकऱ्यांनी आपल्या गावात पर्रिकरांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.

बरौलिया आणि हरिहरपूर या दोन गावांचे मनोहर पर्रिकरांशी खास नातं होतं. पर्रिकर उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर त्यांनी २०१५ साली बरौलिया आणि २०१७ साली हरिहरपूर हे गाव दत्तक घेतले होते. पर्रिकरांनी ही गावं दत्तक घेतल्यानंतर या गावांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. यामध्ये रस्ते, शाळा, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, मनुष्यविकास केंद्र यासारख्या मुलभूत सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या. याशिवाय गावातील तलाव, प्रमुख ठिकाणांबरोबरच प्राथमिक सरकारी शाळेची डागडुजी, रंगरंगोटी आणि सजावट करुन त्याचा कायापालट करण्यात आला.

पर्रिकर या दोन्ही गावांमधील गावकऱ्यांशी स्वत: संपर्कात होते. अनेकदा त्यांनी गावकऱ्यांना दिल्लीमध्ये बोलवून गावचा अधिक अधिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजना या गावांमध्ये कशाप्रकारे रावबल्या जातील यासंदर्भात चर्चा केली. दोन साध्या गावांचा कायपालट करणारा लोकांच्या लाडक्या नेत्याचे निधन झाल्यानंतर या गावांवरही शोककळा पसरली आहे. या दोन्ही गावातील गावकऱ्यांबरोबरच अमेठी मतदारसंघामधील काही नागरिक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन दोन्ही गावांमध्ये पर्रिकरांचे स्मारक उभारण्याची मागणी करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे.

सरकारने पर्रिकरांचा पुतळा उभारण्यासाठी मदत करावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे आणि तसे न झाल्यास गावकरीच निधी उभारून पर्रिकरांचा पुतळा उभारण्यासही तयार आहेत. ‘सरकारच्या निधीमधून पुतळा उभा राहिल्यास आनंदच आहे. पण तसे न झाल्यास आम्हीच निधी गोळा करुन पुतळा उभारू,’ असे बरौलिया गावाचे माजी प्रमुख सुरेंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले. २०१४ साली बरौलिया गावात भीषण आग लागली होती. त्यानंतर अमेठी येथील लोकसभेच्या जागेवर निवडणूक हारल्यानंतर स्मृती इराणी यांनी गावाकऱ्यांची भेट घेऊन हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिलेहोते. पर्रिकरांनी कधी बरौलिया गावाला प्रत्यक्षात भेट दिली नव्हती तरी ते गावाच्या विकासाची माहिती गावकऱ्यांकडून वेळोवेळी घेत असतं.

हरिहरपूर येथे २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी पर्रिकर आले होते असं गावकरी सांगतात. अवघी अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावातील ११५ कुटुंबातील लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पर्रिकरांच्या या भेटीबद्दल बोलताना गावातील रहिवाशी आणि संघाचे कार्यकर्ते असणारे रामा शंकर शास्त्री सांगतात, ‘पर्रिकरांच्या दौऱ्याच्या वेळी मी पुढाकर घेऊन संघासाठी काम करणाऱ्या कुटुंबियांशी पर्रिकरांची चर्चा घडवून आणली होती. एवढ्याश्या भेटीनंतरही पर्रिकरांची माझ्याशी चांगली ओळख झाली. दोन वर्षांनंतर त्यांनी मला फोन करुन दिल्लीला बोलवून घेतले. तेथे त्यांनी गावाच्या विकासासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा केली. पर्रिकरांच्या प्रयत्नांमुळेच आज गावाचा कायापालट झाला आहे. मी एक समान्य कार्यकर्ता आहे. मी कधीही इतक्या साधेपणे वागणारा बडा नेता पाहिलेला नाही. सामान्यांची इतकी काळजी घेणारा, साधे रहाणीमान असणारा असा नेता दूर्मिळच असतो. त्यांनी गावाचा खूप विकास केला. त्यांच्या पुढाकाराने गावात आज अडीच किलोमीटरच्या रस्त्याच्या काम सुरु झाले आहे. गावात औषधी आणि सुगंधी झाडांच्या लागवडीचे कामही त्यांच्याच पुढाकाराने सुरु झाले.’ हरिहरपूरमध्ये पर्रिकरांचा पुतळा असावा असं मत शास्त्रींनी व्यक्त केले आहे.

पर्रिकरांनी स्मृती इराणी यांच्या सल्ल्यानंतर बरौलिया गाव दत्तक घेतले होते असं सुरेंद्र प्रताप सिंग सांगतात. पर्रिकरांच्या निधनाबद्दल बोलताना भावूक झालेले सुरेंद्र म्हणतात, ‘पर्रिकरांचे निधन म्हणजे आमच्यासाठी घरातील व्यक्तीच्या निधनासारखे आहे. आज आमच्या गावात ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांच्यामुळेच आहेत.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर ‘संसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात केली होती. प्रत्येक खासदाराने देशातील कोणतेही एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट होते.