उत्तरप्रदेशातील अमेठी जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत बहिणीला उघड्यावर शौचालयाला जायला लागू नये म्हणून जिल्ह्यातील भाऊ तीला ‘टॉयलेट्स’ बांधून देणार आहेत. रक्षा बंधनानिमित्त बहिणींसाठी ही मोलाची भेट असणार आहे. जिल्हा स्वच्छता समितीकडून या उपक्रमाला ‘अनोखी अमेठी का अनोखा भाई’ असे नावही देण्यात आले आहे.

या योजनेविषयी माहिती देताना अमेठीच्या मुख्य विकास अधिकारी अपूर्वा दुबे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या विविध भागातील ८५४ पुरुषांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून यासाठी त्यांनी ‘ब्रदर्स’ म्हणून नाव नोंदणी केली आहे. यामध्ये जिल्हा स्वच्छता समितीकडून मोफत टॉयलेट्स पुरवण्यात येणार आहेत. मात्र, ही शौचालये फक्त नोंदणीकृत भावांना त्यांच्या बहिणीसाठी देता येणार आहेत. त्यासाठी खर्च जरी शासनाचा असला तरी त्यांनी स्वत: ते बांधून घ्यावयाचे आहे.

यानंतर या उपक्रमासाठी एक लकी ड्रॉ ही काढण्यात येणार असून याद्वारे जिंकणाऱ्या तीन सहभागींना बक्षीसे देण्यात येणार आहेत. यासाठी रोख रक्कम ५० हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. शौचालयांची बांधणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची तपासणी ही समीतीच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्कृष्ट बांधणी केलेल्या टॉयलेट्सना पुरस्कार दिले जाणार आहेत.