लॉकडाउनमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून सहा विद्यार्थ्यांनी थेट विहीर खोदली आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेलथांगडी (Belthangady) या गावातील विद्यार्थ्यांनी ही विहीर खोदून खोदून गावकऱ्यांची मोठी समस्या सोडवली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन लागू झाल्यानंतर गावातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावकऱ्यांना होणारा त्रास पाहून शाळेतल्या सहा मित्रांनी विहीर खोदण्याचं ठरवलं. लगेच त्यांनी खोदकामाला सुरूवात केली आणि अवघ्या चार दिवसांमध्येच त्यांनी १२ फूट विहीर खोदली.

“आम्ही तीव्र पाणी टंचाईचा सामना करत होतो. अखेर माझे पाच मित्र आणि मी विहीर खोदायला घेतली. खोदकामाला सुरूवात केल्यानंतर आम्हाला केवळ मातीच लागत होती. पण बरंच खोदकाम झाल्यावर खडक लागले, नंतर १० फूटपर्यंत खोदल्यावर पाणी लागलं”, अशी माहिती नववीत शिकणाऱ्या धनुषने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली.

यापूर्वी महाराष्ट्रात वाशिममधील एका दांपत्यानेही लॉकडाउनमुळे घरी अडकल्याने मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घेत घरासमोर तब्बल २५ फूट विहीर खोदल्याचं समोर आलं आहे. मानोरा तालुक्‍यातील कारखेडा येथे गवंडी काम करणारे गजानन पकमोडे आणि त्यांची पत्नी पुष्मा पकमोडे यांनी घरच्या घरी काही तरी करायचं हा हेतू समोर ठेवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहीर खोदली. सध्या वाशिम जिल्ह्यात या दांपत्याची चर्चा सुरु असून कौतुक केलं जात आहे.