बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं ते निकालाकडे. पण, निकालाआधीच महाआघाडीची चिंता वाढली आहे. बिहारमध्ये महाआघाडी सत्तेवर येणार असल्याचं निकालपूर्व चाचण्यांतून दिसून आलं आहे. मात्र, त्याचबरोबर आमदारांचा घोडेबाजार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसनं आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे दोन नेते सध्या पाटण्यात मुक्कामी थांबले असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए, तर महाआघाडी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढली. निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकालांकडे लक्ष लागलं असून, निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानं एनडीएमध्ये चलबिल सुरू झाल्याचं वृत्त आहे.

एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांची महाआघाडी सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे निकालानंतर घोडेबाजार शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांना करोना झाला असून क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडे आणि रणदीप सुरजेवाला यांना निकालानंतर बिहारमध्ये निर्माण होणारी राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी आधीच पाटणाला पाठवलं आहे.

आणखी वाचा- Bihar Elections 2020 Exit Poll : बिहारमध्ये सत्तापालटाचा अंदाज; राजद-काँग्रेसला जनतेचा कौल

एक्झिट पोलच्या अंदाजामुळे काँग्रेसमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे एनडीएची चिंता वाढताना दिसत आहे. मात्र, महाआघाडीसमोर घोडेबाजाराचं आव्हान उभं राहताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपल्या उमेदवारांना आधीच सूचना दिल्या आहेत.

विजयानंतर रॅली न काढण्याच्या सूचना काँग्रेसनं उमेदवारांना दिल्या आहेत. त्याचबरोबर घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना पाटणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाणार असल्याचं वृत्त आहे.