विश्व हिंदू परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ८४ कोसी यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यभरातून १ हजार ६९६ कार्यकर्त्यांना अटक केली. मात्र, सरकारचा विरोध पत्करून तसेच अटकसत्राला न घाबरता ही यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार विहिंपने व्यक्त केला आहे. यात्रा रोखण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय मतपेढीवर डोळा ठेवून घेतला असल्याचा आरोप भाजपने केला, तर  समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात सामनानिश्चितीचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
राम जन्मभूमी न्यास समितीचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांनी अयोध्येतून रविवारी परिक्रमेला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या यात्रेत राजकारण आणू नये, असे  असे आवाहन यांनी केले. यात्रा सुरू होण्यापूर्वी रविवारी सकाळी भाजपचे माजी खासदार रामविलास वेदांती आणि आमदार रामचंद्र यादव यांना अटक करण्यात आली.
विहिंपचे नेते अशोक सिंघल यांना लखनौ विमानतळावर तर प्रवीण तोगडिया यांना अयोध्येत अटक करण्यात आली. सुरक्षात्मक उपाय म्हणून उत्तर प्रदेश सरकारने या यात्रेला बंदी घातली होती.  ही यात्रा १३ सप्टेंबपर्यंत चालणार आहे. देशभरातून ७०० जिल्ह्य़ांतून संत अयोध्येला पोहोचतील असा दावा सिंघल यांनी केला.

जातीय तणाव वाढवून विकास प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत.  
राजेंद्र चौधरी,  सपा प्रवक्ते  

उत्तर प्रदेश सरकारने मतपेढीच्या राजकारणापोटीच यात्रेवर बंदी घातली आहे.
वेंकय्या नायडू, भाजप नेते  

समाजवादी पक्ष आणि भाजपचे हे नाटक असून, त्यांनी परस्परांत संधान साधले आहे.
दिग्विजय सिंह, काँग्रेस सरचिटणीस