पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे उद्गार

‘भाजप आणि मोदींना हटविणे हा समस्त विरोधी पक्षांचा अजेंडा आहे. पण भाजपसाठी देशातील भ्रष्टाचार, अव्यवस्था, गरिबी दूर करणे हा अजेंडा आहे. देशाला स्थैर्य देऊन विकास साधणे आणि २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर येऊन लोकशाही मजबूत करणे हा भाजपचा उद्देश आहे’, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी काँग्रेसच्या राजकारणावर टीका केली.

काँग्रेस सातत्याने लोकशाही धोक्याचा आरोप करतो, पण आणीबाणीत काँग्रेसने काय केले होते? प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर काँग्रेसनेच गदा आणली होती. काँग्रेसचीच शान रसातळाला गेलेली आहे. लोकसभेत वटहुकूम फाडण्याचे प्रकार काँग्रेसने केले असा आरोप करून शहा म्हणाले की, गेल्या चार वर्षांत जनतेला काम करणारा पंतप्रधान मिळालेला आहे. मोदी १४ तास काम करतात. जनहिताच्या योजना त्यांनी लोकापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. विकासाचा नारा घेऊनच मोदी सरकारने चार वर्षे कारभार केला. उर्वरित वर्षभरात विकासाचे काम अधिक वेगाने पुढे नेले जाईल!

घराणेशाही संपवली!

बहुपक्षीय सत्ता राजकारणाला जनता कंटाळलेली होती. चार वर्षांपूर्वी मोदींच्या हाती जनतेने सत्ता दिली आणि ३० वर्षांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. मोदी सरकारने काँग्रेसची घराणेशाही संपवली. जातीवाद नष्ट केला. लांगूलचालनाचे राजकारणाला आळा घातला. देशात परिवर्तनाचे युग आणले असा दावा करत शहा म्हणाले की, शेतकरी, दलित, आदिवासी यांच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. स्वयंरोजगाराला चालना देऊन करोडो लोकांना रोजगार दिला आहे. पायाभूत विकासाची मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. आता शेतीमालाला उत्पादनमूल्याच्या दीडपट किमत दिली जाणार आहे.

 विरोधकांची चिंता नाही!

विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपला चिंता करण्याचे कारण नाही. ममत आणि चंद्राबाबू एकत्र आल्याने पश्चिम बंगालमध्ये किंवा आंध्र प्रदेशच्या राजकारणात काय फरक पडणार आहे? २०१४ मध्येही विरोधक भाजपविरोधातच लढले होते, आताही लढतील. त्यांच्याशी दोन हात करण्यास भाजप समर्थ असल्याचा दावा शहा यांनी केला.

 शिवसेनेशी युती हवी!

आगामी निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या साथीनेच निवडणुका लढवाव्यात असे आम्हाला वाटते पण, काय करायचे ते शिवसेनेनेच ठरवायचे आहे. आत्ताही शिवसेना सत्तेत सहभागी आहे, असे मत शहा यांनी व्यक्त केले.