वर्धमान बॉम्बस्फोटाचा तपास  करीत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या चौकशीस तृणमूल काँग्रेस अडथळे आणत आहे; शिवाय शारदा चिट फंड घोटाळ्यातील पैसा वर्धमान बॉम्बस्फोटात वापरण्यात आला, असा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे जाहीर सभेत केला. २ ऑक्टोबरला वर्धमान येथे स्फोट झाला होता.
शहा म्हणाले की, शारदा चिट फंड घोटाळ्यातील पैसा वर्धमान स्फोटात वापरण्यात आला, एनआयएला त्या स्फोटाची चौकशी योग्य प्रकारे करण्यात तृणमूल काँग्रेसने अडथळे आणले व स्फोटात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना वाचवण्यासाठी तसे करण्यात आले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, सीबीआयचा वापर शारदा फंड घोटाळ्याच्या चौकशीनिमित्ताने राजकीय सूड उठवण्यासाठी करण्यात आला, हा आरोप खरा नाही. शारदा फंड घोटाळ्यात अटक केलेले निरपराध आहेत हे ममता बॅनर्जीनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पूर्वी हे आरोप होते,मात्र आता हे सिद्ध झाले आहे की, या घोटाळ्यातील आरोपी हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा बळी दिला. श्यामल सेन आयोग तृणमूल सरकारने अचानक रद्द का केला, असे विचारुन ते म्हणाले की, ममता बॅनर्जीनी काढलेली चित्रे कुणी विकत घेतली, ज्या ममतांनी सिंगूर जमीन आंदोलनात उपोषण केले त्या आता शारदा घोटाळ्यातील आरोपींना वाचवित आहेत.
बांगलादेशातून घुसखोर येतात ज्यांना बांगलादेशातही कुणी थारा देत नाही. वर्धमान स्फोटासाठी पैसा कुठून आला? शारदा चिट फंडातील पैसा त्यात वापरण्यात आला का त्याची चौकशी सीबीआय करीत आहे. ममता बॅनर्जी यांनी मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.