यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात देशाची प्रतिमा डागाळली होती. पण गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सक्षम आणि निर्णायक सरकार देशाला मिळाले आणि सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती होऊ लागली, या शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्र सरकारचे शुक्रवारी कौतुक केले. दोन वर्षांत सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मोदी सरकारला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात १५ दिवस ‘विकासपर्व’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा म्हणाले, यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात देशात फक्त भ्रष्टाचार, घोटाळे यांचाच बोलबाला होता. २१ वे शतक हे भारताचे शतक असल्याची घोषणा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दिली गेली होती. पण यूपीएच्या कारभारामुळे देशाची प्रतिमा डागाळली गेली. आता मोदी सरकारमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. हे शतक भारताचेच राहणार, असे लोकांना वाटू लागले आहे. बऱ्याच वर्षांनी देशाला निर्णायक, राजकीय इच्छाशक्ती असलेले आणि खंबीर सरकार मिळाले. देशापुढे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कोणतीही समस्या असली, तरी त्यावर लगेच मार्ग शोधला जातो. अगदी अलीकडे ‘नीट’च्या प्रश्नावरून हे दिसून आले आहे, असे ते म्हणाले.
देशातील गरिबांच्या, बेरोजगारांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने खूप चांगले काम केले असल्याचे सांगून अमित शहा यांनी पूर्वीच्या सरकारांमध्ये राज्यकर्ते की प्रशासक, ग्रामीण की शहरी, संरक्षण की परराष्ट्र व्यवहार या मुद्द्यांवरून द्वंद्व पाहायला मिळायचे. पण सध्याच्या सरकारमध्ये असे कुठलेही द्वंद्व पाहायला मिळत नाही. अत्यंत समतोल सरकार सत्तेवर आहे, असेही त्यांनी सांगितले.