अमित शहा यांची टीका; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

उत्तर प्रदेशात हिंसाचाराचे वातावरण व्याप्त असल्याचे अलीकडेच मथुरा व कैराना येथे घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी समाजवादी पक्ष सरकारवर हल्ला चढवला आणि पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभेची निवडणूक भाजप सर्वशक्तीनिशी लढणार असल्याचे संकेत दिले. उत्तर प्रदेशात विकास आणि प्रशासन यांचा अभाव ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दोन वर्षे रालोआ सरकारला निर्णायक नेतृत्व दिले आहे, याचा शाह यांनी आवर्जून उल्लेख केला. विकासाच्या मार्गात वारंवार अडथळे आणत असल्यामुळे काँग्रेस अधिकाधिक क्षीण होत आहे. काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे या पक्षाची घसरण सुरू झाली आहे, असे ते म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची  बैठक रविवारी अलाहाबादमध्ये सुरू झाली. त्यापूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी पार पडली.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यत: पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित केला जाण्याची पुरेपूर शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, पक्षाचे सरचिटणीस राम माधव, रामलाल व भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंग व श्रीकांत शर्मा, पक्ष प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह अनेक नेते या बैठकीसाठी अलाहाबादमध्ये पोहचले आहेत. उत्तरप्रदेशमध्ये विकास आणि प्रशासन यांचा अभाव असल्याचे सांगून शाह यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अमित शहा यांनी भाषणात  उत्तरप्रदेशचा उल्लेख करताना, येथील हिंसाचाराच्या वातावरणाला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शहा यांच्या भाषणाबद्दल माहिती देताना सांगितले.