मागच्या वर्षी जेव्हा मी जम्मू-काश्मीरमध्ये आलो तेव्हा आघाडी सरकार होते. आम्ही पाठिंबा काढून घेतल्यामुळे काश्मीरमध्ये आज राज्यपाल राजवट लागू झाली आहे. सरकार कोसळल्यानंतर राजकीय पक्ष खेद व्यक्त करतात पण भाजपा हा असा एकमेव पक्ष आहे जो सरकार कोसळल्यानंतरही ‘भारत माता कि जय’ असा नारा देत आहे. यातून भाजपाची देशभक्ती दिसून येते असे दोन दिवसाच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा मला अजिबात पुनरुच्चार करायची इच्छा नाही. ते विधान करतात आणि लगेच लष्कर-ए-तय्यबाकडून त्यांच्या विधानाचे समर्थन केले जाते असे शहा म्हणाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या ६५ व्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला अमित शहा संबोधित करत आहेत.

याच आठवडयात भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजपा-पीडीपी सरकार कोसळले. काश्मीरमध्ये सरकार गेल्यानंतर प्रथमच अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेसने कितीही षडयंत्रे रचली तरी काश्मीर भारतापासून अलग होणार नाही असे शहा म्हणाले.

काँग्रेस नेत्याच्या विधानाचे लष्कर-ए-तोयबाकडून समर्थन केले जात आहे. याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस आणि लष्कर-ए-तय्यबामध्ये कुठल्या प्रकारचे संबंध आहेत? असा सवाल त्यांनी केला. भाजपासाठी सरकार नाही तर जम्मू-काश्मीरचा विकास आणि सुरक्षा ही दोनच महत्वाची उद्दिष्टये आहेत असे शहा म्हणाले.

राज्यातील मेहबूबा सरकारने विकासाचे संतुलन खराब केले. आज जम्मू-काश्मीर भारताशी जोडलेला आहे तो श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच असे शहा यांनी सांगितले. मेहबूबा सरकारने जम्मू आणि लडाखमध्ये भेदभाव केला असा आरोपही त्यांनी केला. उद्या दुसऱ्या दिवशी रविवारी अमित शहा प्रजा परिषद आंदोलनाशी संबंधित पुस्तकाचे प्रकाशन करतील.