काँग्रेसच्या घटना बचाव मोहिमेवर अमित शहा यांची टीका

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाती घेतलेली घटना बचाव मोहीम ही हास्यास्पद गोष्ट असून घराणेशाही वाचविण्यासाठी केलेला खटाटोप आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. विरोधी पक्ष यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिरस्कार करीत होता आता त्याचे रूपांतर भारताचा तिरस्कार करण्यात झाले आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीशांविरुद्ध काँग्रेसने दिलेली महाभियोगाच्या प्रस्तावाची नोटीस राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यानंतर शहा म्हणाले की, विरोधी पक्षांचा प्रचार हा प्रत्येक संस्था दुर्बल करण्याचा कटाचा एक भाग आहे. वेळोवेळी खऱ्या अर्थाने कोणी घटना पायदळी तुडविली असेल तर तो विरोधी पक्ष आहे.

देशातील प्रत्येक संस्थेने आपले अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला ती संस्था दुर्बल करणे हा विरोधकांच्या डावाचाच एक भाग आहे, असेही शहा म्हणाले.

काँग्रेसने कॅग, निवडणूक आयोग, लष्कर आणि सर्वोच्च न्यायालयावर वेळोवेळी हल्ला चढविल्याचाही उल्लेख शहा यांनी केला, इतकेच नव्हे तर देशांत १९७५ मध्ये लादण्यात आलेल्या आणीबाणीचाही त्यांनी उल्लेख केला.

ज्यांचा लष्कर, न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, रिझव्‍‌र्ह बँक यांच्यावर विश्वास नाही तेच आता लोकशाही धोक्यात असल्याची ओरड करीत आहेत, असेही शहा म्हणाले.