दहशतवाद्याला कोणतीही जात, धर्म, पंत नसतो. तो केवळ एक गुन्हेगार असतो. परंतु कॉंग्रेस पक्षाने आजवर भगवा दहशतवाद व हिंदू दहशतवाद असे विभाजन करुन हिंदू धर्मीयांचीच नव्हे तर पार देशाचीही बदनामी केली आहे. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर टिकास्त्र सोडले. अमित शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाषणाच्या ओघात राहुल गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामैया सहित राजीव गांधींवर देखिल तोंडसुख घेतले. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी भाजपाला ‘हम दो हमारे दो’ या शब्दांत हिणवले होते. परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांसहीत देशातील २० राज्यात आमची सत्ता आहे. आणि लवकर भारतीयांनी काँग्रेसमुक्त भारताचे पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करु असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
अमित शहा सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दरम्यान बंगळूरमध्ये आयोजीत केलेल्या एका सभेत ते बोलत होते. सध्या देशांत शेतकरी आंदोलने, दलित आंदोलने, स्त्री अत्याचार, वाढत जाणारी गुन्हेगारी, बेकारी आहे. तसेच भाजपा मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे नरेंद्र मोदी व भाजपा सरकारच्या नेतृत्वावर विरोधी पक्षाकडून कडकडून टिका केली जात आहे. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी काँग्रेस काळात झालेल्या भ्रष्टाचारांचे दाखले दिले. भाजपाने कर्नाटकात काँग्रेस पक्षाविरोधात आक्रमक प्रचाराला सुरवात केली आहे. अमित शहा यांचा हा दौरा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक १२ मे रोजी होणार असुन मतमोजणी १५ मेला होणार आहे.